बंगळूर : भरधाव ट्रकने महामार्गावरचा दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला उडवल्याने कारमधील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले, तर चौघे गंभीर आहेत. हे कुटुंब कोप्पळहून मंत्रालय येथे देवदर्शनाला निघाले असताना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर कोप्पळजवळच्या भानापूरनजीक हा अपघात झाला.
प्रवीण बाळेकाई (वय ४०), केंचम्मा बाळेकाई (३५), अमृता कोट्याळ (२५), रमेश बळ्ळारी (४५) व चिन्मय अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
बाळेकाई कुटुंब हावेरीहून ओम्नी कारमधून रायचूर जिल्ह्यातील मंत्रालय या देवस्थानला दर्शनासाठी जात होते. शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या लॉरीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने लॉरी महामार्गावरील दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या चारचाकी ओम्नीला धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी कोप्पळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर लगेचच स्थानिक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीएसपी मुत्तण्णा सवरगोळ पुढील तपास करत आहेत.