निवृत्त डीजीपी ओम प्रकाश हत्याकांड, पत्नी पल्लवी, मुलगी कृती.  (Pudhari Photo)
बेळगाव

Karnataka ex-DGP’s murder | तब्बल 10 वार, 20 मिनिटे तडफड, डोळ्यात मिरचीपूड टाकली

माजी DGP ओम प्रकाश हत्याकांडात पत्नी पल्लवीचा कबुलीजबाब, मुलीचीही साथ

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा; राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश (Karnataka ex-DGP Om Prakash murder case) यांच्यावर चाकूने तब्बल दहा वार करण्यात आले असून, या हल्ल्यानंतर ओम प्रकाश वीस मिनिटे तडफडत होते, अशी माहिती त्यांची पत्नी पल्लवी यांनी पोलिसांना दिली. संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणार्‍या या हत्या प्रकरणानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत.

निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी पल्लवी यांना अटक केली. तसेच, त्यांची मुलगी कृती हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ओम प्रकाशच्या हत्येमागे मालमत्ता आणि कौटुंबिक वाद हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. कारवार जिल्ह्यातील दांडेली येथे ओम प्रकाश यांनी खरेदी केलेली कोट्यवधीची जमीनदेखील या हत्येचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी आठवडाभर भांडण सुरू होते. ते वारंवार बंदूक आणून मला आणि माझ्या मुलीला गोळ्या घालण्याची धमकी देत होते. सकाळपासून घरात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडण सुरू होते. दुपारी भांडण वाढले आणि ओम प्रकाशने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. पल्लवी यांनी तपास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला. आपल्या संरक्षणासाठी आम्ही लढलो. आम्ही मिरचीपूड आणि खाद्यतेल त्यांच्या डोळ्यात घातले. चाकूने हल्ला केल्यानंतर त्याचा चेहरा कापडाने बांधला. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ओम प्रकाश यांच्या छाती, हात आणि पोटावर 10 हून अधिकवेळा चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला व त्यांचा मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की, ज्या हॉलमध्ये खून झाला त्या हॉलमध्ये रक्ताचा सडा पडला होता. चाकूने वार झाल्यानंतर ओम प्रकाश तडफडत होते. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे सुमारे 20 मिनिटे ते मृत्यूशी झुंज देत होते. यावेळी त्यांची मुलगी कृतीदेखील त्यांच्यासोबत होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ओम प्रकाश यांच्या मृत्यूनंतर पल्लवीने अखेर एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याच्या पत्नीला आणि स्थानिक एचएसआर पोलिस ठाण्याला फोन करून हत्येची माहिती दिली.

तिसरी व्यक्ती कोण?

पल्लवी ही या प्रकरणातील पहिली संशयित आहे. या हत्येत मुलीची भूमिका काय, याचाही पोलिस तपास करत आहेत. दोघेही पोलिस कोठडीत आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ओम प्रकाशच्या हत्येच्या वेळी घरात तीन लोक होते. त्यांची पत्नी पल्लवी यांनीही पोलिसांना कबूल केले आहे. आता तिसरा व्यक्ती कोण, याचा पोलिस तपास करत आहेत.

ओम प्रकाश यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता

ओम प्रकाश 2017 मध्ये सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी आणि नंतर त्यांनी बंगळूरसह विविध जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी केली होती. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्यांनी ही मालमत्ता त्यांची पत्नी पल्लवी, मुलगी कृती आणि मुलाच्या नावे नोंदवली आहे. ओम प्रकाश यांनी दांडेली येथे जमीन खरेदी केली होती. कोट्यवधीची ही मालमत्ता बहिणींच्या नावावर नोंदवली गेली असल्याचे सांगितले जाते; पण ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी यांनी यावर आक्षेप घेतला. या वादातूनच हत्या झाल्याचा संशय आहे. याचबरोबर आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT