रामनगर : हल्याळ तालुक्यातील सांबरानी वन परिक्षेत्रातील बोंमनहळ्ळी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक टस्कर सोमवारी (दि. २५) सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने वनखात्यात खळबळ माजली आहे. पाण्यात मृत अवस्थेत हत्ती आढळणे संशयास्पद मानले जात आहे. हत्तीचा मृत्यू रविवारी (दि. २४) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना एका हत्तीचे कलेवर बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळले. त्यांनी तातडीने याची माहिती वनखात्याला दिली. त्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. हत्तीचे कलेवर पाण्याच्या मध्यभागी असल्याने ते बाहेर काढण्यासाठी वनखात्याच्या पथकाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
स्थानिकांच्या सहकार्याने दीर्घ प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी पार पडली. त्यानंतर पर्यावरणीय व सुरक्षेच्या कारणास्तव बोम्मनहळ्ळी बॅकवॉटर परिसरातच हत्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे.
नियमानुसार हत्तीचे दात सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन म्युझियम ऑफ मैसूरमध्ये पाठविण्यात आले आहेत. हत्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी हृदय व मूत्रपिंडाचे नमुने बंगळूरमधील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विषबाधा, आजार किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.