बेळगाव

Karnataka Election : काँग्रेसची 70 जणांची यादी निश्चित

मोहन कारंडे

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतलेल्या काँग्रेसने आणखी 70 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. तर 30 उमेदवारांबाबत पक्षात मतैक्य झालेले नाही. त्यामुळे एकूण 100 उमेदवारांची काँग्रेसची दुसरी यादी काही दिवस लांबणीवर पडली आहे. ती 9 एप्रिलनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. आधीच्या घोषणेनुसार ही यादी मंगळवारी 4 एप्रिलला जाहीर होणार होती.

बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, डॉ. गिरीश व्यास यांच्यासह काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. हायकमांडने अनुमती दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी 9 किंवा 10 एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्यातल्या काही उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी दबाव आणला आहे.

बैठकीनंतर खर्गे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यातल्या 100 उमेदवारांची यादी आपण तयार करत आहोत. यासंदर्भात काही ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत. तर काही ठिकाणी तडजोड करून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वरुणा आणि कोलार विधानसभा मतदारसंघांत विरोधीपक्ष नेते सिद्धरामया यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा केली जात आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती. या मतदारसंघांत सध्या बदल करून दुसर्‍या दोन मतदारसंघांत त्यांनी निवडणूक लढवावी का, असा प्रश्न हायकमांडपुढे निर्माण झाला आहे. कोलारमध्ये स्थानिक नेत्यांच्या मागणीमुळे हायकमांडने मंजूरी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही आपणास कोरडगेरे व बेंगलोर येथील पुलकेशी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.

124 जणांची यादी यापूर्वीच जाहीर

पक्षाने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी 25 मार्चरोजीच 124 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. उर्वरित 100 जणांच्या दुसर्‍या यादीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू असताना मंगळवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस बैठकीत 70 जणांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. एकूण 100 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT