बंगळूर : बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीबाबत कर्नाटक सरकार ठाम आहे. यासंदर्भात कृष्णा लवादाकडेही मुद्दा मांडण्यात आला आहे. अलमट्टी जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये बुडीत होणाऱ्या जमिनींचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारवर दबाव आणून अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीसाठी भूमिका स्पष्ट करावी, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
शनिवारी डी. के. शिवकुमार बागलकोट येथे एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाराष्ट्र व आंध्र प्रदेश सरकारने कर्नाटकाविरोधात केंद्राकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळासह या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या वाट्याचे पाणी वापरण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अलमट्टीसाठी मंगळवारी बैठक
बंगळूर : अलमट्टी उंचीवाढीसाठी मंगळवारी दिल्ली येथील कर्नाटक भवनात राज्यातील खासदारांसोबत एक बैठक आयोजित केली जणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला जात आहेत. बागलकोट येथे शनिवारी त्यांनीच ही माहिती दिली.