बंगळूर : शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगला देशी स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. आतापर्यंत बंगळूरमधून 272 बेकायदेशीर बांगला देशी स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले आहे. दोन तस्करांना अटक झाल्यानंतर बांगला देशींना शोधण्यात यश आले. एकूण 178 पुरुष, 94 महिला आणि 12 मुलांना एकत्रितपणे हद्दपार करण्यात आले आहे.
शहर गुन्हे विभाग पोलिसांनी बेकायदेशीर बांगला देशी स्थलांतरितांना शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सध्या ओळख पटलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात पाठवण्याचे काम सुरू आहे. बीएसएफद्वारे त्यांना त्रिपुराच्या सीमाभागातून बांगला देशाच्या हद्दीत नेऊन सोडले जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तीन तस्करांमार्फत बांगला देशी नागरिक भारतात प्रवेश करत होते. एक तस्कर त्यांना भारतीय सीमेपर्यंत आणत होता. दुसरा तस्कर भारतीय सीमा ओलांडून त्यांना भारतात आणत होता. तिसरा तस्कर या बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतातील नोकऱ्यांची माहिती देऊन त्यांच्यासाठी नोकऱ्या शोधून देत होता. या तस्करांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर बांगला देशी नागरिकांचे पत्ते शोधून त्यांना हद्दपार केले जात आहे.