बंगळूर : आम्ही ज्येष्ठ मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पाठीशी आहोत. केवळ तुमच्यावरच नव्हे, तर आणखी चार-पाच काँग्रेस नेत्यांवर ईडीचे छापे पडण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले आहे.
मनी लाँडरिंग आणि विदेशी गुंतवणुकीच्या आरोपांखाली सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बंगळूरमधील निवासस्थानी मुख्यमंत्री शिवकुमार यांनी गुरुवारी रात्री उशिरा भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही कारणासाठी घाबरण्याची गरज नाही. मी माझ्या राजकीय जीवनात अशा अनेक प्रकरणांना सामोरे गेलो आहे. तुम्ही धैर्यवान असले पाहिजे.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केवळ जारकीहोळींवरच नव्हे, तर येत्या काही दिवसांत काँग्रेसच्या इतर तीन-चार महत्त्वाच्या नेत्यांवरही छापा टाकण्याचा कट रचत आहेत. काँग्रेसला पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित कारवाया केल्या जात आहेत. केंद्रात सत्तेत असलेला भाजप आपल्या पक्षाच्या सदस्यांची साधी चौकशीही करत नाही. केंद्र सरकार आपल्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा वापर करून ज्येष्ठ सहकारी जारकीहोळी यांना लक्ष्य करत आहे. हा स्पष्ट राजकीय कट आहे.
राजकारणातून संपवण्यासाठी भाजपचा कट
ईडीने निवासस्थान आणि कार्यालयांवर टाकलेले छापे संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधत, आम्ही परदेशात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही; आम्ही केवळ तशी तयारी करत होतो, असा दावा केला. तसेच ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून त्यामागे बडे नेते आहेत, असा दावा केला. जारकीहोळी म्हणाले, भाजप नेत्यांनी राजकीयदृष्ट्या संपवण्याचा पद्धतशीर कट रचला आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा वापर करून मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
आमचे कुटुंब अनेक दशकांपासून अनेक व्यवसायांत आहे. आमची २ हजार कोटींची उलाढाल होते. त्यामुळे आमच्या घरात दोन कोटी रुपये सापडणे ही काही मोठी गोष्ट नाही. ते पैसे आमचे आहेत आणि आम्ही त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे देऊ. आम्ही आफ्रिकेत खाणकाम आणि व्यापार कंपनी सुरू करण्याची योजना आखली होती. अद्याप गुंतवणूक झालेली नाही, आम्ही ती करण्याच्या प्रक्रियेत आहोत. ही परदेशी गुंतवणूक लक्षात घेऊनच हा छापा टाकण्यात आला. हे खरे आहे की कंपनी मुलगा आणि मुलीच्या नावावर तयार करण्यात आली आहे. आम्ही या संदर्भात आयकर विभागाला सर्व कागदपत्रे आधीच दिली आहेत. ईडी जेव्हा आवश्यक कागदपत्रे मागेल, तेव्हा आम्ही ती देऊ, असेही जारकीहोळी म्हणाले.