karnataka politics File Photo
बेळगाव

Karnataka Politics: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री लवकरच दिल्लीकडे

जूनमध्ये संपणार चार खासदारांचा कार्यकाळ : विधान परिषदेच्या सात जागाही होणार रिक्त

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : जून महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या चार आणि विधान परिषदेच्या सात जागांसाठी पक्षाचे उमेदवार निवडण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री तथा केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार दिल्ली दौरा करणार आहेत.

केरळम्‌मध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हायकमांड या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, भाजपचे इरण्णा कडाडी आणि नारायण कोरागप्पा यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत २५ जून रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे गोविंदराज, नझीर अहमद, एमटीबी नागराज, प्रतापसिंह नायक, तिप्पनप्पा, सुनील वल्यापूर आणि बी. के. हरिप्रसाद यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत ३० जून रोजी संपणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग या पदांसाठीचे निवडणूक वेळापत्रक कोणत्याही क्षणी जाहीर करू शकतो. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारांच्या निवडीची तयारी सुरू केली आहे. याच निमित्ताने दिल्लीला जाणारे हे दोन्ही नेते आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे, राज्यातील काँग्रेसमधील सत्ता हस्तांतरणाबाबतचा संभ्रम दूर करण्याची विनंतीही करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणखी एक पाऊल पुढे टाकत खासदार राहुल गांधी यांच्याकडे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची परवानगी देण्याची विनंती करणार आहेत.

शिवकुमारांना आशा

शिवकुमार यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे असे नमूद केले आहे की, केरळम्‌मध्ये सरकार स्थापन होत असल्याने, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना ९ किंवा १४ मे रोजी दिल्लीला बोलावतील. २० मे पर्यंत कर्नाटक काँग्रेसमधील संभ्रम दूर करून वरिष्ठ नेते आपल्याला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवतील, अशी आशा त्यांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT