बेळगाव

Karnataka politics: सिद्धूसमर्थकांना १० मंत्रिपदे

मुख्यमंत्र्यांची रणनीती; महिनापूर्ती शिवकुमारांची, अपेक्षा विस्ताराची; सोमवारी दिल्लीला जाणार

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : मुख्यमंत्री शिवकुमार यांनी राज्याची सूत्रे हातात घेऊन ३ जुलैला एक महिना पूर्ण झाला. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षापूर्ती अजून झालेली नाही. त्यांचा दिल्ली दौराही लांबणीवर पडला असून, ते येत्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार यादीसह दिल्लीला रवाना होत आहेत. त्यामुळे महिनापूर्ती झाल्यानंतर तरी विस्तार होणार का, यात कुणाकुणाला स्थान मिळणार, याकडे इच्छुकांसह काँग्रेसच्या साऱ्याच आमदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

मंत्रिमंडळातील एकूण रिक्त असलेल्या २० पदांपैकी किमान १० पदे सिद्धरामय्या समर्थकांना देण्याची रणनीती शिवकुमार यांनी आखली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असून ते ६ जुलै रोजी मायदेशी परतणार आहेत. त्यांच्या भेटीसाठी शिवकुमारांना आपला २ जुलैचा नियोजित दौरा पुढे ढकलावा लागला. राहुल यांना भेटूनच शिवकुमार मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी ते बंगळूरमध्ये ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही बनवलेली आहे.

सिद्धरामय्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्याशीही चर्चा केली आहे. डॉ. परमेश्वर यांनी हरिप्रसाद यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी द्यावी, यावर चर्चा केल्याचेही समजते.

शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात रिक्त असलेल्या २० मंत्रिपदांपैकी किमान १० पदे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांना देण्याच्या उद्देशाने ही रणनीती आखली जात आहे. त्यासाठी शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. तत्काळ मंत्रिमंडळ विस्तार करावा, असा सल्ला देणाऱ्या सिद्धरामय्यांनी आमदार ए. एस. पोन्नण्णा यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, असे सुचवले असल्याचे कळते.

पोन्नण्णा हे कायदेतज्ज्ञ असून सरकारला त्यांच्यासारख्या लोकांची गरज असल्याचे सिद्धरामय्यांनी सांगितल्याचे कळते. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाकडून झालेल्या बेकायदेशीर भूखंड वाटपाच्या आरोपांसंदर्भात पोन्नण्णा यांनी सरकारला योग्य मार्गदर्शन केले असून त्यांना मंत्रिपद दिल्यास कोडगू जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचेही म्हटले आहे.

तथापि, पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मंत्रिपद नको, अशी सूचना हाय कमांडने दिली आहे. परिणामी हाय कमांडला पोन्नण्णा यांच्या पदाबाबत पटवून द्यावे लागेल, असे शिवकुमारांनी सांगितल्याचे कळते. याशिवाय सिद्धूसमर्थक आणखी ९ नेत्यांचा समावेश करण्याचे नियोजन शिवकुमारांनी केले आहे. मात्र ती नावे अद्याप गुलदस्स्त्यात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT