बंगळूर : गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेली राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून अखेर मंत्रिमंडळ विस्तार येत्या सोमवारी ३ ऑगस्ट रोजी होणार असून, सायंकाळी ५ चा मुहूर्त शपथविधीसाठी निश्र्चित करण्यात आला आहे. राजभवनात हा सोहळा होईल. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पंचांगानुसार शुभ वेळ पाहून विस्ताराची वेळ निश्चित केल्याचे मानले जाते. तथापि, विस्तारात कुणाकुणाला स्थान मिळणार हे अद्याप निश्र्चित नसून, सध्या एकूण चार याद्या बनवण्यात आल्या आहेत. रविवारीच यादी अंतिम होणार आहे. दरम्यान दुष्काळ व कावेरी वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या आमदारांच्या कुटुंबीयांना व काही निमंत्रितांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंत्री किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना कोणत्याही प्रकारचा जल्लोष, विजयोत्सव आयोजित न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला कोणते स्थान दिले जाणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तीन दिवसांपासून दिल्लीत असलेले मुख्यमंत्री शिवकुमार, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतंत्रपणे तीन याद्या सादर केल्या आहेत. या याद्यांचा आढावा घेतल्यानंतर हायकमांड अंतिम निर्णय घेणार आहे. शिवाय, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा यावर हाय कमांडने आधीच एक अंतर्गत सर्वेक्षण करून एक स्वतंत्र यादी तयार केली आहे. त्यामुळे सध्या एकूण ४ याद्या तयार आहेत. कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागाने शुक्रवारी ३१ रोजी अधिकृत निमंत्रण तयार केले असून प्रथेनुसार ते निमंत्रितांना वितरित केले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अंतिम यादीवर निर्णय घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार शनिवारी १ रोजी आपल्या निवासस्थानी संघटन सचिव वेणुगोपाल व राज्य काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांची बैठक घेऊन यादीवर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुणाच्या समावेशामुळे सरकारची प्रतिष्ठा वाढेल व पक्षाला फायदा होईल, हे विचारात घेतले जाणार आहे.
तीन निकष
पक्षनिष्ठा, पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याची क्षमता, स्वच्छ चारित्र्य हे मंत्रिपदासाठीचे निकष असतील. यादी अंतिम झाल्यानंतर वेणुगोपाल रविवारी २ रोजी संध्याकाळी बंगळूरमध्ये दाखल होणार असून मुख्यमंत्री शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व केपीसीसी अध्यक्ष हरिप्रसाद यांची भेट घेतील. त्यानंतर मंत्र्यांची यादी राजभवनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे कळते.
बसवराज रायरेड्डी अध्यक्ष?
मंत्रिपदाचा आग्रह धरणारे ज्येष्ठ नेते बसवराज रायरेड्डी यांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यास काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पसंती दर्शवली आहे. राहुल यांच्याशी चर्चेत माजी मंत्री एच. के. पाटील व दिनेश गुंडूराव यांचीही नावे सुचवण्यात आली होती. मात्र खर्गे यांनी रायरेड्डी यांची नियुक्ती योग्य ठरेल, असा कौल दिला. या निर्णयाला मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली असल्याचे समजते. वयोमानानुसार रायरेड्डी यांना मंत्रिपद देता येत नसल्याने त्यांना सभापतिपद देऊन प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संभाव्य नावे
मंत्रिमंडळ विस्तारात सहा ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांसोबत १४ तरुणांना स्थान दिले जाणार आहे. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सी. एस. नाडगौडा, एन.ए स. बोसराजू, तन्वीर सेठ, आर. बी. तिम्मापूर, पुट्टरंगशेट्टी, एच. आर. गवियप्पा, यशवंतरायगौडा पाटील, एच. सी. बालकृष्ण, शरत बचेगौडा, रघुमूर्ती, शिवलिंगेगौडा, प्रसाद अब्बय्या किंवा नरेंद्र स्वामी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.