बंगळूर : दीड महिन्यापासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार अखेर होणार आहे. बुधवारी, २२ जुलैरोजी दुपारी राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात २० नवीन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नूतन मंत्रिमंडळामध्ये बेळगाव जिल्ह्यातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निर्णय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीवर अवलंबून आहे.
सध्याच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते टी. बी. जयचंद्र, एच. के. पाटील यांचा समावेश मंत्रिमंडळात करणे योग्य असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. अधिकृत सूत्रांनुसार, यशवंतराय गौडा पाटील, रिझवान हर्षद, शरथ बच्चेगौडा, पुटरंगा शेट्टी, बेलूर गोपालकृष्ण, लक्ष्मण सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर हे उद्या मंत्री म्हणून शपथ घेतील.
आज किंवा उद्या
मंत्रिमंडळात समाविष्ट करायच्या मंत्र्यांच्या यादीवर एकमत न झाल्यास, हा विस्तार गुरुवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगार आणि प्रशासकीय सुधारणा खात्याला राजभवनात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रात्री बैठक
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी हायकमांडच्या सूचनेनुसार मंगळवारी दिल्लीत मुख्यमंत्री शिवकुमार, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दाखल झाले होते. त्यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित केली.
यादी निश्चित, चारित्र्य पडताळणी
मंत्र्यांची यादी गेल्या आठवड्यात निश्चित झाली होती. खासदार व निवृत्त आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांना यादीची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंत्र्यांचे चारित्र्य चांगले असणे, ते दोनपेक्षा जास्त वेळा विधानसभेवर निवडून आलेले असणे, काँग्रेसला किती फायदा होईल, ते कोणत्या समुदायाचे आणि प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात हा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.
त्यानुसार, राहुल गांधी यांना एकूण २० जणांची नावे देण्यात आली आहेत. त्यात दोनपेक्षा जास्त वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या आणि आतापर्यंत मंत्रिपद न मिळालेल्या १४ जणांचा समावेश आहे. यादीवर मंगळवारी रात्री उशिरा बैठक होणार असून त्यानंतर मंत्रिपदांसाठीची नावे अंतिम करून राजभवनाला पाठवली जातील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.