Satish Jarkiholi Pudhari
बेळगाव

Satish Jarkiholi | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय पक्षश्रेष्ठींचा : जारकीहोळी

बेळगाव जिल्ह्यातील ५ आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक

पुढारी वृत्तसेवा

अथणी : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार व पुनर्रचना लवकरच होणार आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ५ आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पण कोणाला मंत्रिपद द्यायचे याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. बेळगाव जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळणार की दोन, याबाबत सध्या ठामपणे काही सांगता येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

अथणी येथे आयोजित खासगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या खात्याबाबत मी समाधानी आहे. पक्षसंघटना मजबूत करून 2028 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे, हा आमचा उद्देश आहे. बेळगाव जिल्ह्याला एक की दोन मंत्रीपदे द्यायची, याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.

कृष्णा नदीतील पाण्याची पातळी सध्या घटली असून पुढील 15 दिवसांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्यास सरकार सज्ज आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र सरकारशी लवकरच चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीतही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सदाशिव भुटाळी, रमेश सिंदगी, राजू जमखंडीकर, बसू भुटाळे, अनिल सुनदोळी, सुनील संख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT