आर. एच. नटराज
बंगळूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य भाजपमध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह आणि नेतृत्वावरुन झालेला वाद आता हळूहळू निवळत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावात बदल करून लागू केलेल्या व्हीबीजी रामजी योजनेविरुद्ध काँग्रेसने मोठा लढा पुकारल्यानंतर भाजप हायकमांडने राज्यातील नेत्यांनाही याविरोधात उभे राहण्याचे आदेश दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांसाठी पक्षाला तयार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातून आता बी. वाय. विजयेंद्र आणि आर. अशोक एकाच व्यासपीठावर आल्याने पक्षातील वाद निवळल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
वरिष्ठांच्या सल्ल्याने नेतृत्वावरुन सुरू असलेला वाद तात्पुरता बाजूला ठेवणारे भाजप नेते आता राज्य सरकारविरुद्ध संघर्ष उभारुन आगामी निवडणुकांसाठी तयारी करत आहेत. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याने नाराजी व्यक्त करुन नेतृत्वबदलासाठी आग्रही असलेल्या विरोधकांनीही आता भूमिका बदलली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक विजयेंद्र यांच्या बरोबरीचे आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन आणि पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्याशी दीर्घ चर्चा केली. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी राज्य नेतृत्वाबाबत अनेक सूचना दिल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत विजयेंद्र प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील. तुम्ही फक्त अध्यक्षपद बदलण्याचा आग्रह धरला आणि संघटनेकडे लक्ष दिले नाही तर कर्नाटकात पक्षाची दुर्दशा होण्याची शक्यता आहे, असा इशारा भाजप हायकमांडने त्यांना दिला आहे.
सरकारविरोधी रोष पथ्यावर
कोगिलू लेआउट वाद, बळ्ळारीतील दंगली, हुबळी घटना आणि मका खरेदी गोंधळ यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारविरुद्ध जनतेचा रोष निर्माण झाला आहे. त्याचा खुबीने वापर करुन भाजपच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे याचा वापर करावा, असे आदेश नवीन व संतोष यांनी दिले आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांना फोन करुन वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घ्यावे. बैठक घेऊन कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने राज्यातील सर्व भागात जात सर्वेक्षण करुन आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी काँग्रेसचा संघर्ष अपयशी ठरेल याची खात्री करून घेण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्हास्तरीय आंदोलनाची तयारी
बंगळूरमधील भाजप कार्यालयात सोमवारी (दि. 12) स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आर. अशोक आणि प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र हबऱ्याच काळानंतर एकाच व्यासपीठावर दिसले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे कोगिलू तोडगा आणि पीडितांच्या पुनर्वसन योजनेवरील वरिष्ठ नेते एस. आर. विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखालील शोध समितीचा अहवाल तपासला. त्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांशी पक्ष संघटनेबद्दल सल्लामसलत केली. पक्ष नेतृत्वावरुन झालेल्या संघर्षामुळे बंगळूर ते म्हैसूरपर्यंत आयोजित मुडा पदयात्रेचा फारसा प्रभाव पडला नाही. विधानसभा निवडणुकीला अजूनही अडीच वर्षे शिल्लक आहेत. त्यावेळी असे लढे कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवू शकत नाहीत. म्हणून अशा लढ्याऐवजी जिल्हा पातळीवर विविध आंदोलनांचे आयोजन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवले पाहिजे, या निर्णयाप्रत पक्ष आला आहे.