चिकोडी, बेळगाव : उसाला किमान साडेचार हजार रुपये दर, थकीत रकमेची त्वरित प्रतिपूर्ती अशा मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन तीव्र होत चालले असून, बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग रोखण्यास बंदी घातली आहे. १ नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव साजरा होणार असताना, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आदला दिवस बंद पाळण्यासाठी निवडला आहे.
गुर्लापूर क्रॉस येथे सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकरी संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी यांनी शनिवारी ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली. ‘कर्नाटक बंद’दरम्यान भाजीपाला विक्री, दूधपुरवठा आणि सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. गुर्लापूर क्रॉस येथील सभेत पुजारी यांनी बंदची हाक दिली. तसेच व्यापारी, शाळा-कॉलेज, वाहतूकदार संस्था व सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
उसाला योग्य दर आणि थकीत बिले देण्याकडे सरकार डोळेझाक करत असून, बळीराजाला आर्थिक संकटात ढकलले जात आहे, असा आरोप नेत्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन घोषणा केली, तरच बंद मागे घेतला जाईल; अन्यथा शनिवारी सकाळपासूनच राज्यभरात रास्ता रोको व महामार्ग रोखण्यात येतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, शनिवारी सकाळपासूनच महामार्गांवर उतरून आंदोलन छेडण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.