बेळगाव

Karnataka Lokayukta raid: बागलकोट नगरविकासवर लोकायुक्तांचा छापा

अपात्रांना भूखंड वाटप केल्‍याचे आरोप : कागदपत्रांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

अंकली : अपात्र व्यक्तींना भूखंड वाटप केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बागलकोट नगरविकास प्राधिकरणाच्या (बीयूडीए) पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली.

लोकायुक्त पोलिस अधीक्षक महानिंगा नांदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) सुरेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत धारवाड व गदग लोकायुक्त विभागातील अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. अपात्र व्यक्तींना १८ भूखंडांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करणारी तक्रार लोकायुक्तांकडे दाखल झाली आहे. या तक्रारीच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून वाटप प्रक्रियेशी संबंधित फाईल्स, अर्ज, मंजुरीची कागदपत्रे आणि इतर नोंदींची तपासणी करण्यात येत आहे.

छाप्यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी जागा वाटपाशी संबंधित अनेक फाईल्स, प्रशासकीय नोंदी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली. वाटप प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, लाभार्थ्यांच्या पात्रतेची योग्य तपासणी आणि कोणतीही अनियमितता झाली आहे का, याची चौकशी सुरू आहे.

या कारवाईबाबत नांदगावी म्हणाले, १८ भूखंडांच्या वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्या अनुषंगाने कार्यालयात तपासणी करण्यात येत आहे. चौकशी सुरू असून कागदपत्रांचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT