कुनिगल: कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग ७५ वर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. बिदनगेरे बायपासजवळ भरधाव कॅन्टर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कॅन्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मृतांमध्ये सीबेगौडा (वय ४५), त्यांची पत्नी शोभा (वय ३६), मुलगी दुम्भिश्री (वय १६) आणि मुलगा भानुकिरण गौडा (वय १४) यांचा समावेश आहे. हे सर्वजण रामनगर जिल्ह्यातील मागडी शहरातील नटराज लेआउटचे रहिवासी होते. सीबेगौडा आपल्या कुटुंबासह मुलगा भानुकिरण याला कुनिगल येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत सोडण्यासाठी जात होते, त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कुनिगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.