बेळगाव : पावसाने दडी मारल्याने भात पिकाला पाणी सोडण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याचा कृषी पंपाजवळ वाढलेले गवत कापताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. ६) सकाळी मण्णीकेरीत (ता. बेळगाव) ही दुर्घटना घडली. सत्याप्पा वैजू बेकिनकेरी (वय ४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सत्याप्पा बेकिनकेरी भात पिकाला पाणी सोडण्यासाठी शेताकडे गेले होते. कृषी पंप असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. हे गवत कापत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर शेतकऱ्यांनी तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर काकती पोलिस ठाण्याला कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत सत्याप्पा बेकिनकेरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. घटनेची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे तपास करत आहेत.