कारदगा : कारदगासह परिसरातील वीजसमस्या सोडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन भाजप सरकारच्या काळात कारदगा येथे ११० केव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करून घेतले होते. या उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन झाल्यामुळे या भागातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. हे उपकेंद्र शेतकरी, कामगार, उद्योजक आणि नागरिकांसाठी आधारवड ठरेल. शिवाय परिसरातील ५ गावांचा वीज प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून २१ कोटी २३ लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या ११० केव्ही विद्युत उपकेंद्र बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खा. अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते.
आ. जोल्ले म्हणाल्या, महापूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे या भागातील नागरिकांना वारंवार वीजसमस्यांचा सामना करावा लागत होता. नवीन वीज उपकेंद्रामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना अधिक सुरळीत वीजपुरवठा मिळेल. नागरिकांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा.
अण्णासाहेब जोल्ले यांनी, निपाणी मतदारसंघाच्या विकासाला आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि सभासदांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले.
हालशुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, हेस्कॉमचे अधिक्षक अभियंता शिवाजी खरे, ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्राम पंचायत अध्यक्षा सुरेखा घाळे आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अरविंद खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूरज माळी यांनी स्वागत तर सुदीप उगळे यांनी प्रास्ताविक केले. आ. शशिकला जोल्ले आणि माजी खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या विद्युत उपकेंद्राचा लाभ कारदगासह माणकापूर, कसनाळ, ढोणेवाडी आणि बारवाड या गावांना होणार आहे.
कार्यक्रमास बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले, निपाणी शहर भाजपचे अध्यक्ष राजू गुंदेशा, पवन पाटील, नितेश खोत, देवाप्पा देवकते, लक्ष्मण पसारे, भरत भागाजे, राजू भदरगडे, चिमासो नाडगे, कार्यकारी अभियंता कृष्णाप्पा हंडगर, सुप्रभा बंडगर, वैशाली खराडे, एम. टी. अप्पण्णावर, सुधीर गुणघी, बसवराज पुजारी, नेमिनाथ नेमन्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशवंत गावडे यांनी आभार मानले.