निपाणी : 'मराठी शाळांना कन्नडमधून मूल्यशिक्षण पुस्तके' या विषयावरील वृत्त 'दै. पुढारी'ने मंगळवारच्या (दि. २) अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर साहित्यिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मराठी भाषिक समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून सामाजिक माध्यमांवरही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मराठी शाळांना कन्नड मूल्यशिक्षण पुस्तके म्हणजे संस्कार की कानडीकरणाची सक्ती, असा सवालही व्यक्त होत आहे. अनेकांनी या विषयाला वाचा फोडल्याबद्दल 'दै. पुढारी'चे अभिनंदन केले.
मूल्यशिक्षण हा केवळ एक विषय नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य, देशप्रेम, मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांसारखी मूल्ये बालमनात रुजविण्यासाठी मातृभाषेइतके प्रभावी माध्यम दुसरे कोणतेही असू शकत नाही.
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, बालकाला त्याच्या मातृभाषेतून दिलेले ज्ञान अधिक सहजपणे समजते आणि दीर्घकाळ स्मरणात राहते. सीमाभागातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यशिक्षणाची पुस्तके कन्नड भाषेत देणे हे विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेसाठी अडथळा ठरू शकते. मूल्यशिक्षणाचा उद्देश केवळ धडे वाचणे नसून त्या मूल्यांचे आचरणात रूपांतर करणे, हा आहे. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा विद्यार्थ्याला शिकविला जाणारा आशय त्याच्या मनाला आणि भावविश्वाला थेट स्पर्श करतो.
मातृभाषा मराठी हेच ते प्रभावी माध्यम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मूल्यशिक्षणासारखा संवेदनशील विषय मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेत उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांचा भाषिक व सांस्कृतिक अधिकार आहे. शासनाने याची दखल घेऊन मराठी माध्यमांसाठी मूल्यशिक्षणाची पुस्तके तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी मराठी भाषिकांची मागणी आहे.