कंग्राळी : घरांमध्ये शिरलेले पावसाचे पाणी. Pudhari
बेळगाव

Belgaum Rain: कंग्राळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

घरे, दुकानांतून पाणी शिरले; भाजी, पिकांचेही नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कंग्राळी : कंग्राळी खुर्द परिसराला मंगळवारी (दि. 24) दुपारनंतर झालेल्या वळीव पावसाने झोडपून काढले. या वादळी पावसामुळे घरे, दुकानांतून पाणी शिरले. गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावरुन वाहू लागल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. पावसाने भाजी, पिकांची हानी झाली.

मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान काळे ढग गावावर दाटून आले. त्यानंतर 4.30 ते 6.30 पर्यंत वादळी वारा, गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. अर्ध्या तासात गटारी तुडुंब वाहू लागल्या. त्यातच एपीएमसीकडून येणारे पाणी बाजूच्या गटारीत जाण्यासाठी सोय नसल्याने मुख्य रस्त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आले. चौकात असलेल्या परशराम जाधव यांच्या घरात घुसून धान्य, घरगुती वस्तूंचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले. रात्री उशिरा 9 पर्यंत घरातील पाणी ओसरले नाही.

त्याचबरोबर भरत जाधव यांनी नव्यानेच सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व झेरॉक्स दुकांनात पाणी शिरुन त्यांचे 15 हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्याचबरोबर परिसरातील चार ते पाच दुकानातूनही पाणी शिरून किरकोळ नुकसान झाले आहे.

सायंकाळी 6.30 नंतर पीडीओ गोपाळ नाईक, माजी उपाध्यक्ष कल्लापा पाटील, वैजनाथ बेन्नाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावरून येणाऱ्या पाण्याबाबत स्मार्टसिटी अंतर्गत झालेल्या कामाच्या त्रुटी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवून पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत ठोस आश्वासन दिले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT