खानापूर : दोन दिवसांपासून तालुक्याला पावसाच्या संततधारेने झोडपून काढले असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मलप्रभा नदीसह बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक गावांच्या संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने थैमान मांडले आहे. पश्चिम घाटासह तालुक्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभा नदीसह म्हादई, मुंगेत्री, काळी आणि पांढरी नदी तसेच मार्कंडेय नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. पश्चिम घाटातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने बहुतांश गावातील नागरीकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे कणकुंबी, जांबोटी, शिरोली, हेम्माडगा परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पाणी पातळीत वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणी नागरीक जीव धोक्यात घालून प्रवास तसेच मासेमारी करीत आहेत. त्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
मलप्रभेच्या पाणी पातळीत लक्षणिय वाढ झाल्यामुळे हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली गेले आहे. केवळ तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आगामी दोन दिवसात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हब्बनहट्टी मंदिर पाण्याखाली गेल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तथापि नदी परिसरात जातांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.