बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि परिसरातून दुचाकी लांबविणार्या चोरट्याला जेरबंद करण्यात अखेर एपीएमसी पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. मोहम्मदशाहिद अब्दूल हमीद (वय 28, रा. काकती) असे चोरट्याचे नाव असून तो पेशाने मेकॅनिक आहे.
एपीएमसी पोलिस ठाण्यात केएलई रुग्णालय व परिसर आवारातून दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मार्केट एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या सुचनेनुसार एपीएमसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात काकती येथील मेकॅनिक मोहम्मदशाहिद यानेच चार दुचाकी लांबविल्याचे आढळून आले. त्याला अटक करुन त्याच्याकडून 1 लाख 12 हजार किंमतीच्या दोन हिरो होंडा स्प्लेंडर, एक होंडा अॅक्टिव्हा आणि एक बजाज डिस्कव्हर अशा चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.