बेळगाव : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांनी विदेशात जाऊन नोकरीची संधी शोधू नये. आपल्या देशात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय संस्था आहेत. या ठिकाणी विविध संशोधनांना प्राधान्य दिले जात आहे. विविध रोगांचे त्वरित निदान करून त्यावर उपचार शोधले पाहिजेत. शिकण्याची उर्मी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहिली पाहिजे. निरोगी समाज निर्माण करणे तुमच्या हातात आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले.
काहेरचा (केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च) पंधरावा पदवीप्रदान सोहळा मंगळवारी (दि. 3) केएलई शताब्दी सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नड्डा बोलत होते. काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्षस्थानी होते.
मंत्री नड्डा म्हणाले, आपण अनेक वर्षांपासून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींद्वारे रोगांवर नियंत्रण मिळवावे लागेल. अॅलोपॅथीसोबत आयुर्वेदाला पदवी म्हणून स्वीकारण्याचा विचार यापूर्वी करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रभावी सेवा देण्यासाठी प्रयत्न करावा.
मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलते प्राध्यापक व कॅन्सर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. ते म्हणाले, आपल्या देशातील समस्यांवर स्वतः उपाय शोधले पाहिजेत. ज्याप्रमाणे रुग्णांची काळजी घेण्यासाठी कुशल नर्सिंग स्टाफची कमतरता आहे, त्याचप्रमाणे डॉक्टरांचीही कमतरता आहे. त्यासाठी आगामी काळात येणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, आपल्या देशात केवळ डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता नाही तर जगभरात डॉक्टरांची कमतरता आहे. फक्त भारतच त्यावर मात करू शकतो. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून लोकांचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. चंद्रकला मेटगूड, डॉ. तेजश्री प्रधान आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.