बेळगाव

Belgaum: ‘जवाहर’ची पातळी ३४ फुटांपर्यंत खालावली

शहर व उपनगराला ५ दिवसांआड पाणीपुरवठा ; पावसाळा लांबल्‍यास पाणीटंचाईची भीती

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावाची पाणी पातळी ३४ फुटापर्यंत खालावली आहे. नगरपालिका शहर व उपनगराला ५ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा करत आहे. तलावातील उपलब्ध पाणीसाठा ८ ते १० फुटापर्यंतच वापरता येणे शक्य आहे. त्यानंतर गाळमिश्रित पाणी येणार आहे. पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही तर शहराला पाणीटंचाई भेडसावण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

गतवर्षी १२ मेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे मे महिन्यात तलावात ३९.४ फूट पाणी होते. जून महिन्यात तलाव ओसंडून वाहू लागला होता. शहर व उपनगरात नळ कनेक्शन वाढली असल्याने तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. वेदगंगा नदीच्या पाण्याचा उपसा करून शहर व उपनगराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली तर शहर व उपनगरातील विहिरी, कूपनलिका यांचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्‍त गणपती पाटील यांनी दिली.

शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलाव परिसराची स्वच्छता निपाणी नगरपालिकेच्यावतीने जेसीबीच्या साहाय्‍याने करण्याची गरज आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरगुप्पी परिसरातील ओढ्यातून पावसाळ्यामध्ये जवाहर तलावात पाणी येते. गतवर्षी जूनमध्‍ये पाणीपातळी ४६ फूट सहा इंचावर गेली होती. यावर्षी मे महिन्यात तलावातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे सर्वांना लवकर मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. परिसरातून येणाऱ्या ओढ्यातील कचरा आणि झुडपे जेसीबीद्वारे काढण्याची गरज आहे.

तलावाच्या तिन्ही बाजूला झाडेझुडपे व वेली वाढल्‍या आहेत. त्याचीही स्वच्छता होणे गरजेचे आहे. शिरगुप्पीकडून येणाऱ्या ओढ्यामध्ये काटेरी झुडपे वाढली असून तलावात पाणी जाण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच सर्वच ओढ्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शहराला भेडसावत असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने नवीन नळ कनेक्शन देणे बंद करावे, अशी मागणी होत आहे. नवीन नळ कनेक्शन दिल्यावर लगेचच मीटर बसवले जात नाही. त्यामुळे बांधकामाला पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. शहरात १९५०० नळ कनेक्शन झाले आहेत. तलावातील पाणी पातळी अत्यंत खालावली असल्याने बांधकामासाठी नवे नळ कनेक्शन देणे बंद करण्याची गरज आहे.

तलावात २२ फुटांहून अधिक गाळ आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे. तलावाच्या मुख्य धरणाच्या भिंती जवळील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढला तर पाणीटंचाई उद्‍भवणार नाही. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT