ऐनापुर ः पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रसंत गुणधरनंदी मुनी महाराज. शेजारी अन्य मान्यवर. pudhari photo
बेळगाव

राज्य सरकारला जाग आणणार

गुणधरनंदी मुनी महाराज ः 6 ते 8 जूनपर्यंत ऐनापुरात राज्यव्यापी मेळावा

पुढारी वृत्तसेवा

अंकली ः जैन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. समाजाच्या विविध मागण्या व जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी सरकारला पुन्हा साकडे घालण्यात येणार आहे. त्यासाठी 6 व 8 जूनपर्यंत ऐनापूरमध्ये (ता. कागवाड) मेळावा व धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रसंत आचार्य श्री 108 गुणधरनंदी मुनी महाराज यांनी दिली.

ऐनापुरातील भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात गुरुवारी (दि. 22) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्यावर्षी जैन मुनींची हत्या झाल्यानंतर हुबळीत झालेल्या केलेल्या जैन मुनी व महाराजांच्या उपोषणावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री जमीर अहमद खान व आणि इतर मंत्र्यांनी भेट देऊन जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन देऊन एक वर्ष उलटले तरीही महामंडळ स्थापन करण्यासह समाजाच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे, ऐनापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तीन दिवसीय मेळाव्यात राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्यासह मुख्यमंत्री व राज्यातील सर्व खासदार व आमदारांंना आमंत्रित केले जाणार आहे. यावेळी सुमारे दोन लाखापेक्षा जास्त जैन धर्मियांचा श्रावक व श्राविका उपस्थितही राहणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना निवेदन देऊन राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्यपालांना निवेदन देऊनही राज्य शासनाने जैन समाजासाठी विकास महामंडळ स्थापन न केल्यास व महत्त्वाकांक्षी योजना न राबविल्यास राज्यातील सर्व दिगंबर जैन मुनी, महाराज, भट्टारक यांच्या माध्यमातून उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याचीही रुपरेषा मेळाव्यात आखली जाईल, असे गुणधरनंदी मुनी महाराजांनी स्पष्ट केले.

जैन समाजाच्या प्रमुख मागण्या

  • जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे

  • मुनी, महाराज, भट्टारकस पट्टारक यांना विहारावेळी संरक्षण द्यावे

  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जैन बांधवांना तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी अनुदान द्यावे

  • जैन विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक खात्याकडून शिष्यवृत्ती पुन्हा देण्यात यावी.

  • जात गणतीत समाजावर अन्याय झाला असून नव्याने गणती करावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT