बेळगाव : शहरातील सिंधी कॉलनी येथे एका दुकानात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती सीईएन पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीईएन विभागाचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार्यांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल यासह बेटिंग घेणार्याला अटक केली. यामधील एकजण फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी (दि. 27) ही कारवाई करण्यात आली.
सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून बेटिंगही जोरात सुरू आहे. सिंधी कॉलनी येथील एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकून उद्धव जयरामदास रोचलानी (वय 61, रा. सिंधी कॉलनी, बेळगाव) याला अटक केली तर त्याचा मुलगा करण रोचलानी हा फरार झाला आहे.
अटक केलेल्या व्यक्तीकडून 12 आयफोन, 13 बेसिक हँडसेट, एक स्मार्ट टीव्ही, हॉटलाईन ऑडिओ मिक्सर आणि 2 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीईएन पोलिस आणि कॅम्प पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. फरारी बुकीचा शोध पोलिस घेत आहेत. सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.
रोज विविध संघाच्या लढती होत आहेत. या लढतीदरम्यान विविध संघ व खेळाडूंवर बेटिंग लावले जात आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंगचा प्रकार सुरु असल्याचे उघडकीस येत आहे. बेटिंग घेणार्यांचे संबंध इतर राज्यातील सट्टेबाजांशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांची चौकशी सुरू आहे.