बेळगाव : शहरातील मुख्य रस्ते तसेच थोड्याशा दुर्लक्षित भागात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील किंमती ऐवज लांबवणार्या आंतरराज्य चोरट्याला पोलिसांनी अटक केली. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली. दिनदयाळन ऊर्फ दिन जयशीलन (रा. राजाजीनगर, ता. श्रीरंगम, तामिळनाडू) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी माळमारुती पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पार्क केलेल्या कारची काच फोडून तब्बल चार लाखांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कारमालकाने माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखूून पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी कसोशीने तपास सुरु केला. तपास करताना रस्त्याकडेला लावलेल्या कारची अगदी सहजरित्या काच फोडून त्यातील ऐवज लांबवणारा सराईत आंतरराज्य चोरटा त्यांच्या हाती लागला. त्याला अटक करुन त्याच्याकडून सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे दोन अॅपल कंपनीचे लॅपटॉप, दीड लाख रुपये किंमतीचे दोन अॅपल कंपनीचे आय पॅड, 50 हजाराचा ऑटोस्कोप असा सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त केला.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, रहदारी व गुन्हे शाखेचे डीसीपी निरंजन अर्स, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी यांनी कारवाई केली. या कारवाईत उपनिरीक्षक उदय पाटील, एम. जी. कुरेर, सी. जे. चिन्नप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, मल्लिकार्जुन गाडवी, महेश ओडेयर यांनी भाग घेतला.