खानापूर (प्रतिनिधी) –
जिथं शिक्षणासाठी रस्ता नाही, तिथं स्वप्नांच्या पायवाटा पायांनीच कोरणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घोसे खुर्द या अतिदुर्गम गावातील सविता मधुकर मिराशी हिने बारावीच्या पोरीक्षेत ९१.५१ टक्के गुण मिळवून संपूर्ण कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बस नाही, मोबाइल नेटवर्क नाही, घरची परिस्थिती हलाखीची – पण जिद्द कमालीची. वडील वारकरी, शेतकरी. रोज दहा किलोमीटर जंगलातून पायपीट करत तिने हायस्कूल पूर्ण केलं. पुढे खानापूरच्या वसतिगृहात राहून तिने ताराराणी पदविपूर्व महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलं.
कोणतीही खास शिकवणी नाही. मार्गदर्शक ठरले महाविद्यालयातील शिक्षक आणि तिचा आत्मविश्वास. अभ्यासात सातत्य, वसतिगृहातील वेळेचा योग्य वापर आणि मनात एकच निर्धार – "आई-वडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी करायचं." या निर्धारानेच सवितानं हे यश गाठलं.
प्राचार्य अरविंद पाटील आणि शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे सविताच्या मनात ‘आपण मागास भागातून आलोय’ असा न्यूनगंड कधीच उभा राहिला नाही. तिच्या यशावर आज गाव, कुटुंब आणि कॉलेज सगळेच हरखून गेले आहेत.
सविताच्या वडिलांचा निर्धार स्पष्ट आहे – "कष्ट कितीही करावे लागले तरी चालेल, पण मुलीचं शिक्षण थांबवायचं नाही." सविताचं पुढचं स्वप्न आहे – बेळगावमधून BCA पदवी पूर्ण करायची. मात्र आर्थिक अडचणी तिच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.
शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तींनी पुढे आल्यास, तिच्या शिक्षणाचं स्वप्न उंच भरारी घेईल.
सुविधांचा अभाव, जंगलाची वाट, वसतिगृहाचं निवास आणि जिद्दीनं पेटलेलं मन... सविताच्या प्रवासात फक्त ती नाही, तर एक संपूर्ण पिढी प्रेरणा घेऊ शकते. तिच्या संघर्षाची ही कहाणी म्हणजे "जिथे इच्छा, तिथे मार्ग" याचं जिवंत उदाहरण आहे.