बंगळूर : देश सध्या अडचणीत आहे. लोकांना युद्ध हवे की बुद्ध हे ठरवावे लागेल. बुद्धाची शांती आणि धर्माचे पालन हे अधिक प्रसंगोचित आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
येथील सिद्धार्थ बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित बुद्धवंदना कार्यक्रमात सहभागी होउन खर्गे बोलत होते. शांततापूर्ण सहजीवन साध्य करता येते. मात्र सध्या आपल्यासमोर प्रश्न असा आहे की, आपल्याला युद्ध हवे आहे की बुद्ध? कोणालाही युद्ध नको आहे, म्हणून शांतता जपली पाहिजे. बुद्धांच्या शिकवणींचे पालन करणे ही लोकांचीही इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत, संपूर्ण जग युद्ध टाळण्यास आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वांचे पालन करण्यास उत्सुक आहे. युद्ध हानिकारकच असते. मात्र अपरिहार्य स्थितीत देश वाचवण्यासाठी युद्ध करावे लागते.
स्वाभिमानासाठी, देशातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी, हक्कांसाठी, संविधानासाठी आणि धर्मासाठी अपरिहार्यपणे लढावे लागेल. आताही अशीच गरज निर्माण झाली आहे. मात्र काही लोक युद्धाचा वापर प्रसिद्धीसाठी करतात, अशी टीकाही खर्गेंनी केली. या देशावर यापूर्वी अनेक हल्ले झाले, पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा आम्ही त्यांना तीन वेळा धडा शिकवला. तरीही पाकिस्तान आपला स्वभाव सोडत नाही. भारताला त्रास देण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. आपल्या सैनिकांमध्ये त्याचा सामना करण्याची ताकद आहे. भारत आजपर्यंत पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. म्हणून मी सैनिकांचे आभार मानतो, असेही खर्गे म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या ठोस पावले उचलली आहेत. आपल्यावर हल्ला करणार्या देशाला आपल्या सशस्त्र दलांनी योग्य धडा शिकवला आहे, असे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सोमवारी (दि.12) बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ पत्रकारांशी ते बोलत होते. नरेंद्र मोदींच्या मजबूत नेतृत्वासमोर आणि आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्यासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. पंतप्रधानांनी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. दहशतवादाचा पुरस्कर्ता असलेल्या पाकिस्तानला संपवण्यासाठी पूर्ण युद्ध आवश्यक होते. पाकिस्तान आता जागे झाला नाही, तर येत्या काळात तो पूर्णपणे नष्ट होईल, असा इशाराही कुमारस्वामींनी दिला.
युध्दबंदीमुळे सैनिकांमध्ये नाराजी : प्रियांक खर्गे
आपल्या सैनिकांनी सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तथापि, केंद्र सरकारच्या युद्धबंदीच्या निर्णयामुळे सैन्य आणि सामान्य भारतीय नागरिक निराश झाले आहेत, अशी खंत ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी व्यक्त केली. बंगळूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तान हा विश्वासू देश नाही. तरीही युद्धबंदीची घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे आणि त्याचा प्रचारही केला जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबल्यानंतर लष्करी कारवाईच्या यशाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपल्या सैनिकांनी पाकिस्तानी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या यशाचे श्रेय आपल्या सैनिकांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. म्हैसूरमधील एच. डी. फोर्ट येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी 1971 च्या युद्धाची आजच्या परिस्थितीशी तुलना करत नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटबद्दल किंवा पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनाबद्दल बोलत नाहीये. मी माझे भाषण युद्धबंदीपुरते मर्यादित ठेवेन. युद्धबंदी जाहीर करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे होती. सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करून निर्णय जाहीर करता आला असता.