कंग्राळी : कंग्राळी खुर्द गावच्या हद्दीतील कुमारस्वामी ले आऊट वसाहतीतील सागाची झाडे बेकायदेशीरपणे तोडण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार बुडा आणि वनखात्याने संगनमताने केल्याचा आरोप कंग्राळी खुर्दमधील शेतकरी मधू पाटील यांनी केला आहे.
कंग्राळी हद्दीतील सर्व्हे क्र. 199/5 मधे मधू पाटील यांनी 1990 मध्ये सागवान, शिसम व अन्य जातीची सुमारे 700 रोपे लावली. डोक्यावरुन पाणी आणून त्यांनी ती जगवली व वाढवली आहेत. त्यापैकी 380 झाडांची नोंद 7/12 उताऱ्यांवर आहे. परंतु, संबंधित जमीन बुडा प्रशासनाने संपादित केली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने जमिनीसह झाडांचाही पूर्ण मोबदला मिळावा अशी मागणी करत न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आजूबाजूच्या जागेत इमारती बांधल्या आहेत. सर्व्हे क्र. 199/5 मध्ये झाडे असल्याने अद्याप एकही इमारत बांधली गेली नाही. परंतु, 15 दिवसापूर्वी संबंधित जागेतील काही क्षेत्रातील सागवान, निलगिरी व अन्य झाडांची तोड केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी वृक्षतोड परवानगी कागदपत्रांची मागणी वन खाते आणि बुडा अधिकाऱ्यांकडे केली. परंतु, त्यांच्याकडून परवानगी दाखविण्यात आली नाही. प्लॉटमालकांना याबाबत विचारले असता त्यांनीही कानावर हात ठेवले. यापूर्वीही रस्ता करण्यासाठी 10 ते 12 सागवानची झाडे तोडली होती. त्यावेळीही त्यांनी आक्षेप घेतला होता. एक गरीब शेतकरी रोपे लावून ती वाढवतो. प्रशासन मात्र कोणताही मोबदला न त्यांची कत्तल करते. हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.