बेळगाव : स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या आमदार राजू कागे यांच्या मागणीला आता भाजपमधूनही पाठिंबा मिळत आहे. सरकारकडून विकास होत नसेल तर स्वतंत्र उत्तर कर्नाटक करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे विधान परिषद सदस्य हणुमंत निराणी यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या भागासाठी भरीव निधी देण्यात यावा. निधी देता येत नसेल, विकास करता येत नसेल तर स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार राजू कागे यांनी करून सत्ताधारी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. आता त्यांच्या या मागणीला भाजपचे विधान परिषद सदस्य निराणी यांनी पाठिंबा दिला आहे.
निराणी म्हणाले, उत्तर कर्नाटकातील सिंचन योजना रखडलेल्या आहे. कावेरीच्या तुलनेत कृष्णा नदीला महत्व देण्यात येत नाही. याठिकाणचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. पिकांना हमी भाव देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. उद्योगांना वाव नाही. नवीन उद्योग आणले जात नाहीत. त्यामुळे या भागाचा विकास करायचा असेल तर भरीव निधी देण्यात यावा. त्यासाठी वेळ निर्धारित करण्यात यावा. जर सरकारला उत्तर कर्नाटकाचा विकास करता येत नसेल, त्यांच्याकडे निधी नसेल तर स्वतंत्र उत्तर कर्नाटक करण्यात यावे.