मधुकर पाटील
निपाणी: इचलकरंजी येथील २० वर्षीय युवकाचा खुन करून त्याचा मृतदेह निपाणीजवळ अर्जुननगर (ता.कागल) हद्दीत जवाहलाल तलावनजीक असलेल्या ओढ्यात फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर उघडकीस आलेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी मुरगुड पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास चालवला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.6) सकाळी याबाबत अर्जुनी (ता. कागल ) येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी अर्जुननगर हद्दीत शिपुरकर व निकम बंधू यांच्या शेताच्यामधून जाणाऱ्या ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मुरगुड पोलिसांना दिली.
त्यानुसार घटनास्थळी मुरगुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष करे, बिट हवालदार बजरंग पाटील, अमर कुंभार, संतोष भांदिगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची पाहणी करून तो पाण्यातुन बाहेर काढला. यावेळी सदर युवकाच्या डोक्यावर अज्ञातांनी धारदार हत्यारांनी खून करून त्याचा मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचे निदर्शन आले. खून झालेल्या युवकाची उंची ५ फूट असून त्याच्या अंगावर जांभळ्या कलरचा टी-शर्ट तर निळ्या कलरची फुल पॅन्ट तर उजव्या हातात चांदीचे कडे असून त्याच्या अंगावर जांभळ्या कलरचा टी-शर्ट व काळ्या कलरची पॅन्ट आहे.
दरम्यान हा खुन नेमक्या कोणत्या कारणातुन झाला हे स्पष्ट झाले नसून मुरगूड पोलिसांनी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील तपास चालवला आहे. दरम्यान अर्जुननगर परिसरात खून झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.