बेळगाव

…तर राजकीय निवृत्ती घेईन : आमदार रमेश जारकीहोळी

मोहन कारंडे

अथणी : पुढारी वृत्तसेवा : अथणी, कागवाड, गोकाक विधानसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी निश्चित असून कागवाडमधून श्रीमंत पाटील, अथणीतून महेश कुमठळ्ळी तर गोकाक मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. जर अथणीतून उमेदवारी डावलली गेली तर निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडून राजकीय निवृत्ती घेईन, असा इशारा आ. रमेश जीरकीहोळी यांनी दिला.

येथील विश्राम धाममध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अथणी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला, याविषयी गेले अनेक महिने झाले चर्चा सुरू आहे. परंतु वरिष्ठांनी तुम्ही कामाला लागा, तुम्हाला उमेदवारी निश्चित आहे, अशी सूचना दिल्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उमेदवारीविषयी कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. या मतदारसंघांमध्ये मी जलसंपदा मंत्री असताना अमजेश्वरी पाणी योजना अंमलात आणू, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 28 मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते ककमरीजवळ कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला एक लाख शेतकरी बांधव जमण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या कामाला लागावे, असे आवाहन जारकीहोळी यांनी केले.

कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावे. बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकून राज्यात पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. डॉ. अनिल सौदागर व दलित नेते शशी साळवे यांनी आ. रमेश जारकीहोळी यांचा सत्कार केला. यावेळी अथणी मंडळ भाजप अध्यक्ष रवी संक, लिंगप्पा नंदेश्वर, मल्लिकार्जुन आनंदाचे, अमोल नाईक आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT