बेळगाव

Hyderabad-Bengaluru Bus Fire: साखरझोपेत 20 प्रवासी ठार; हैदराबाद-बंगळूर स्लीपर बसला आग

दुचाकीला धडकेनंतर इंधन टाकीचा स्फोट

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : हैदराबादहून बंगळूरला जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागून बसमध्ये निद्राधीन असलेल्या 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 21 प्रवाशांनी काचा फोडून बाहेर उड्या टाकल्याने ते बचावले. आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील चिन्नाटेकुरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 41 वर हा अपघात घडला. बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी बसखाली सापडली आणि त्यानंतर इंधनटाकीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. त्यात दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे.

हैदराबादहून बंगळूरला जाणाऱ्या बसमध्ये 41 प्रवासी होते. ही बस रात्री 10.30 वाजता हैदराबादहून निघाली होती. बसने पहाटे 3.30 वाजता कर्नुल शहराजवळ उलिंदाकोंडाजवळ एका दुचाकीला धडक दिली. त्याबरोबर दुचाकी बसखाली गेली आणि दुचाकीची इंधन टाकीला जोराची धडक बसली. त्याचबरोबर दुचाकी आणि बसचे घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. त्यामुळे बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाला आणि ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही सेकंदात हा प्रकार घडला. गाढ झोपेत असलेले प्रवासी आवाज आणि आगीमुळे जागे झाले. काहींनी मदतीसाठी ओरड चालवली, तर काहींनी बसचा आपत्कालीन दरवाजा मोडून बाहेर उड्या मारून आपली सुटका करून घेतली. मात्र, 20 प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ते जिवंत जळाले. बहुतेक प्रवासी हैदराबाद आणि बंगळूर शहरातील होते. अपघातानंतर बसचालक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बस पूर्णपणे जळाली आहे. आग लागताच एका प्रवाशाने आपत्कालीन खिडकीची काच फोडली आणि 15 लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

नियमांचे उल्लंघन

ज्या बसला आग लागली, त्या बसचे 16 चलन आणि 23 हजार 120 रुपये दंड प्रलंबित आहे. 27 जानेवारी 2024 ते 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत बसने 16 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. नऊ वेळा नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. वेगाने आणि धोकादायक वाहन चालवण्याचे उल्लंघनही केले आहे. ही बस डीडी 01 एन 9490 क्रमांकाने नोंदणीकृत आहे. एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने बसने पेट घेतला, अशी माहिती आंध्र प्रदेशच्या परिवहन मंडळ अधिकाऱ्यांनी दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कर्नुल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य हाती घेतले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत भीषण आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. रामी रेड्डी, वेणुगोपाल रेड्डी, सत्यनारायण, श्रीलक्ष्मी, नवीन कुमार, अखिल, जश्मिता, अकिरा, रमेश, जयसूर्या आणि सुब्रमण्यम हे प्रवासी अपघातातून बचावले.

बंगळूरमधील एकाच कुुटुंबातील चौघे

बसमधून प्रवास करणाऱ्या बंगळूरमधील एका कुटुंबाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रमेश (वय 35), अनुषा (वय 30), मान्विता (वय 10) आणि मुनीश (वय 12) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबाची नावे आहेत. रमेश गेल्या 15 वर्षांपासून बंगळूरमधील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. कंपनीमार्फत पर्यटनासाठी ते हैदराबादला गेले होते.

बसने प्रथम दुचाकीला धडक दिली. नंतर बॉम्बस्फोटासारख्या आवाजाने आगीचा भडका उडाला. प्रवाशांना आमच्या डोळ्यांसमोर जळताना पाहावे लागले. आम्ही बसपासून 5 मीटर अंतरावर असहाय्यपणे उभे राहिलो, मात्र आम्हला काहीही करता आले नाही.
-बचावलेला एक प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT