गुलबर्गा : पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीचा आधी गळा चिरून आणि नंतर तिच्या अंगावरून गाडी चालवून निर्घृणपणे हत्या केली. गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात बालुर्गी गावाजवळ शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. शैला जाधव (वय 28) असे विवाहितेचे नाव असून, संशयित तिचा पती अक्षयकुमार जाधव आणि सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
दांपत्य मूळचे बारामतीचे. अक्षय रिक्षाचालक आहे. पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या अक्षयने शैलाची हत्या करण्याचा पक्का कट रचला होता. त्यानुसार तो आपल्या पत्नीला देवर्शनाच्या बहाण्याने गाणगापूरला घेऊन जात होता. सोबत वाहनात त्याचे आई-वडिलही होते.
प्रवासात दोघांचे भांडण झाल्याचे समजते. त्यानंतर बालुर्गी गावाजळ त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आणि पत्नीला बाहेर ओढून काढत विळ्याने आधी तिचा गळा चिरला. शैला आपला जीव वाचवण्यासाठी रक्ताने माखलेल्या अवस्थेतही पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पतीने तिला गाडीने धडक दिली आणि नंतर तिच्या अंगावरून गाडी चालवून तिला ठार मारले. हत्येचे दृश्य मोबाईल फोनमध्ये चित्रित झाले आहे..
घटनास्थळी अनेकांनी आरडाओरड करून, तर काहींनी अक्षयला दगड मारून शैलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. गुलबर्गा एसपी अद्दूर श्रीनिवासुलू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अक्षय आणि त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अफजलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवासलू म्हणाले, गाणगापूरला जाताना ही हत्या करण्यात आली. अक्षय-शैलाचे लग्न होऊन चार वर्षे झाली होती. अक्षयला शैलावर संशय होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.