बेळगाव : पुरेशा पुराव्यांअभावी पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. महादेव मुत्ताप्पा वडेर, (रा. हडीगनाळ, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, 23 जून 2015 रोजी फिर्यादी अडव्याप्पा हा शेताकडे गेला होता. घरात कुणीही नव्हते. याची संधी साधत महादेवने पत्नी मायव्वाला सकाळी 11.30 च्या सुमारास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यातच त्याने तिचा गळा दोरीने आवळून खून केला. त्यानंतर तिच्या तोंडात विषाची बाटली ओतून तिने विष पिऊन जीवन संपवले आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला
अडव्याप्पा घरी आला असता ही घटना त्याच्या नजरेला पडली. त्यानंतर त्याने कुलगोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर संशयित आरोपीवर पुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. याप्रकरणी पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाने साक्षीदार व कागदोपत्री पुरावे तपासले. मात्र, सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही. त्यामुळे, न्यायालयाने संशयिताची निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. चिदंबर होनगेकर, अॅड. विशाल चौगुले यांनी काम पाहिले.