बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त नैऋत्य रेल्वेने हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे 1 ते 8 जुलैपर्यंत धावणार असून सात फेर्या होणार आहेत. या रेल्वेमुळे बेळगावसह खानापूर तालुक्यातील वारकर्यांची सोय होणार आहे.
विशेष रेल्वे 1, 2, 3, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी धावणार आहे. यादिवशी ही रेल्वे हुबळीतून पहाटे 5.10 वाजता सुटणार असून ती लोंढा स्थानकावर सकाळी 6.58 वाजता तर खानापूरला 7.29 वाजता पोहोचणार आहे. ती? बेळगाव रेल्वे स्थानकावर 8.15 वाजता येणार असून 8.20 वाजता मार्गस्थ होणार आहे. दुपारी चार वाजता ती पंढरपूरला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही रेल्वे त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पंढरपूरमधून सुटणार असून बेळगावला रात्री 12.05 वाजता पोचणार आहे. तर खानापूरला रात्री 12.40 वाजता व लोंढा स्थानकावर मध्यरात्री 1.29 वाजता पोचेल. हुबळीला ती पहाटे 4 वाजता पोचणार आहे. ही रेल्वे बेळगाव स्थानकावर पाच मिनिटे थांबणार असून अन्य लहान स्थानकांवर एक ते दोन मिनिटे थांबेल.
नैऋत्य रेल्वेने विशेष गाडीची व्यवस्था केल्याने बेळगाव, खानापूरसह जिल्ह्यातील वारकर्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. गाडी दिवसा धावणार असल्याने वारकर्यांना विठुरायाचे दर्शन करुन परतणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे, समाधान व्यक्त होत आहे.