खबर कर्नाटकची  Pudhari File Photo
बेळगाव

तीन मंत्री, एआयसीसी सदस्यही जाळ्यात

हनीट्रॅप प्रकरण : सखोल चौकशी करण्याची राजकारण्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सहकार मंत्री के. एन. राजण्णा, त्यांचे पुत्र राजेंद्र यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांनी स्वत: जाहीर केली आहे. यातच आता आणखी तीन मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एका नेत्यालाही या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई-कर्नाटक भागातील एक प्रभावी मंत्री आणि बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघातील एक मंत्री, बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघातील आणखी एक मंत्र्याला या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एका प्रभावी नेत्याच्या बाबतीतही हनीट्रॅपचे जाळे विणण्यात आले होते. मंत्री राजण्णा यांनी सुमारे 48 नेते हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट गुरुवारी (दि. 20) विधानसभेत केला होता. त्यानंतर याविषयी आता देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असणार्‍या नेत्यांचा यामध्ये हात असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. राजकारणामध्ये उच्च पद मिळवण्यासाठी कोणतीही पातळी गाठणे योग्य आहे का? सध्याचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. 48 नेत्यांचे हनीट्रॅप सीडी, पेन ड्राईव्ह असल्याचे उघडकीस आल्यानंतर यामध्ये आपलाही समावेश असल्याचे आश्चर्यकारक विधान समाज कल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय मंत्र्याकडे हनीट्रॅपच्या जाळ्यातील काहीजण गेले होते. जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न त्या मंत्र्यानी ओळखला. संबंधित व्यक्तीविषयी संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीची चौकशी केली. या चौकशीवेळी हनीट्रॅपचे जाळे उघडकीस आले. यामागील सूत्रधाराचे नावही त्या व्यक्तीने सांगितले. या जाळ्यामध्ये अडकलेल्यांची नावेही त्या मंत्र्यांनी जाणून घेतल्याचे समजते.

सूत्रधार समोर यावा : सतीश जारकीहोळी

हनीट्रॅप प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकाची मानहानी होत आहे. या जाळ्यामागे असणार्‍या संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई गरजेची आहे. आपल्या भावाच्या बाबतीत झालेल्या प्रकरणात केवळ तिघांना अटक झाली होती. त्यानंतर सदर प्रकरणातील सूत्रधाराची माहिती उघडकीस आली नव्हती. त्यामुळे हनीट्रॅप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. शुक्रवारी (दि. 21) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. हनीट्रॅपमध्ये आणखी काहीजणांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयी संबंधित मंत्री, आमदार मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी मांडत आहेत. आपणही काही विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहेत. हे प्रकरण गंभीर असून सखोल चौकशीची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT