बेळगाव : होळीच्या पूर्वसंध्येला ढोलवादनात रमलेले बालचमू. Pudhari Photo
बेळगाव

होलिकोत्सव आज; उद्या रंगोत्सवाची धूम

शहर-उपनगरात जय्यत तयारी : बाजारपेठेत उलाढाल, सामूहिक होळीसाठी तरुणाई सज्ज

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर उपनगरात गुरुवारी (दि. 13) होळी सण साजरा होणार असून शुक्रवारी (दि. 14) धुलिवंदनानिमित्त रंगोत्सवाची धूम असणार आहे. होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण असून गल्लोगल्लीत होळी कामण्णा मूर्तीला नैवेद्य अर्पण करुन होळी पेटविण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन वाईट प्रवृत्तीची प्रतिकात्मक होळी करुया, असे आवाहनही विविध संस्थांनी केले आहे.

शहर उपनगरात विविध तरुण मंडळातर्फे सार्वजनिक होळी पेटविण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. गोवर्‍या, टिमक्या तसेच पूजा साहित्याची लगबग बुधवारी सुरु होती. फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळी सण साजरा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रंगोत्सव होतो. शहरात गल्लोगल्ली होळी कामण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गोवर्‍या व लाकडे रचून होलिकायै नमः हा मंत्र म्हटला जातो. होळी सणाच्या पूर्वसंध्येला मंडप घालणे, लाकूड आणण्याची लगबग होती. होळीचे वेध लागताच लहान मुले टिमक्या वाजवून लक्ष वेधून घेत आहेत. बाजारपेठेत रंग, पिचकार्‍या, मुखवटे खरेदीसाठी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात गर्दी झाली होती. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जात असल्याने हरभळा डाळ, गूळ तसेच नारळ खरेदी होत होती.

शुक्रवारी होणार्‍या रंगोत्सवाची तरुणाईला मोठी उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोष पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने पाण्याची नासाडी टाळून कोरड्या रंगाचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी विविध ठिकाणी उंचावर जलतुषार यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे, रंगात भिजत तरुणाई थिरकणार आहे. काही तरुण मंडळांनी ग्रामीण भागातून टँकर मागवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT