बेळगाव : सुळग्याकडून बेळगावकडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून थेट दुभाजकावर चढली. बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर हिंडलग्यातील (ता. बेळगाव) मध्यवर्ती कारागृहासमोर नुकताच हा अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले. क्रेन आणून ती कार बाजूला काढण्यात आली.
घटनेची अधिक माहिती अशी, सुळग्याकडून एक कार बेळगावकडे येत होती. त्यात चालक एकटाच होता. हिंडलग्यात आल्यानंतर दुभाजक सुरु होणार्या ठिकाणी पथदीप नसल्याने अंधार असतो. या अंधारात पथदीप दिसत नाहीत. त्यातच तिथे असलेल्या काही दुकानांमुळे ग्राहक दुचाकी रस्त्यावरच लावतात. या वाहनांना चुकविण्याच्या नादात वाहने दुभाजकावरच चढत आहेत. कारचालकालाही अंधारात दुभाजक दिसले नाहीत. त्यामुळे, ती दुभाजकांवर जाऊन लोंबकळत थांबली. चालकाचे नशीब बलवत्तर असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर क्रेन मागवून कार खाली घेण्यात आली.
पथदीप सुरु होणारे ठिकाण धोकादायक बनले आहे. याठिकाणी एक फलक उभा करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्वरित या दुभाजकाजवळ फलक लावून व पथदीप सुरु करावा. तसेच नियमबाह्य वाहने पार्क करणार्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.