बेळगाव ः आरटीओ सर्कलमध्ये काँग्रेस भवन असतानाही राज्य सरकारने आता हिंडलगा येथे काँग्रेस भवन उभारण्यासाठी एक एकर जागा मंजूर केली आहे. गुरुवारी बंगळुरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे नाव आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ’ असे करण्यात येणार आहे.
हिंडलगा गावातील रि.स.नं. 189/1 मधील 1 एकर पडीक जमीन सरकारी मूल्याच्या 5 टक्के दराप्रमाणे काँग्रेस भवन ट्रस्ट बंगळूर यांना मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच पाच कि.मी. अंतरात दोन काँग्रेस भवन होणार आहेत. सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड येथील रि.स नं. 840 मधील 5 एकर सरकारी जमीन मुरगोड कंकण निर्मिती फाऊंडेशनला विनाशुल्क 35 वर्षाच्या लीजवर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुधारित एमएसई सीडीपी मार्गसूचीनुसार आवश्यक 15 टक्के (149.31 लाख रु.) राज्य सरकारकडून मंजूर करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत औषधे आणि सौंदर्य प्रसाधने दुरुस्ती विधेयक-2025, कर्नाटक चित्रपट, कर्नाटक राज्य विद्यापीठ (दुसरी दुरुस्ती) विधेयक-2025 आणि सांस्कृतिक कार्यकर्ते (कल्याण) दुरुस्ती विधेयक-2025 या विधेयकांना मंत्रिमंडळ बैठकीत संमती दर्शविण्यात आली आहे. ही विधेयके बेळगावमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येतील.