धारवाड : धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिशय जवळून लष्कराचे एक हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवरून गेल्याने तसेच हेलिकॉप्टरने तीन घिरट्या मारल्यामुळे लोकांत चर्चेचा विषय बनला आहे.
बुधवारी (दि. १३) सकाळी ही घटना घडली. हेलिकॉप्टरने कार्यालयाभोवती तीन फेऱ्या मारल्या आणि जमिनीच्या अगदी जवळून उडताना कानठळ्या बसवणारा आवाज केला. त्यामुळे काही काळ लोकांमध्ये घबराट पसरली.
आकाशात लष्कराचे हेलिकॉप्टर अचानक दिसल्याने गर्दी जमली. लोकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये हे दृश्य चित्रित केले. तीन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, हेलिकॉप्टर अखेरीस हुबळीच्या दिशेने गेले. ही तांत्रिक अडचण होती की प्रशिक्षण उड्डाण, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.