Pudhari News Network
बेळगाव

Rain Update | पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस उत्तर कर्नाटकासह बंगळूर व इतर १५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित केले आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भागामध्ये ९ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. कारवार, मंगळूर, उडुपी, बळ्ळारी, बंगळूर ग्रामीण, बंगळूर शहर, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमगळूर, चित्रदुर्ग, दावणगिरी, हासन, मंड्या, म्हैसूर, रामनगर, तुमकूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी बंगळूरसह बेळगाव, धारवाड, बिदर, गदग, हावेरी, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी, शिमोगा, विजयनगर आणि कोलारमधील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. सकाळपासून कडक ऊन असताना दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. नवरात्रौत्सवानिमित्त संपूर्ण राज्यात मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पण, पाऊस कोसळत राहिल्याने कार्यक्रमांना लोकांची गर्दी कमी झाली. काही ठिकाणी पाऊस कमी झाल्यानंतर उशिरा कार्यक्रम सुरू करण्यात आले. मंदिरांत सभागृहांमध्ये आयोजित कार्यक्रम वेळेत सुरू झाले. खुल्या जागेवर आयोजित कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

आणखी पाच दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने नवरात्रौत्सव आणि दसरोत्सव पावसातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक भागांतील शाळांना सध्या दसरोत्सवाची सुट्टी आहे. पण, पावसामुळे सणाच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

बंगळुरात अडीच तासांत १०८ मि.मी.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण आहे. परतीच्या पावसाने बंगळूर आणि इतर ठिकाणी घरांची पडझड झाली. शनिवार आणि रविवारी रात्री केवळ अडीच तासांत १०८ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे बंगळुरातील विहार अपार्टमेंट परिसर तसेच महालक्ष्मी ले आऊट परिसरातील ६३ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. काही घरांची पडझड झाली. त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे शहरात सुमारे ८०० खड्डे पडले असून, ते तातडीने दुरुस्त करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT