शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डीजेबरोबर लेझरचा होणारा वापर. Pudhari Photo
बेळगाव

डीजेमुळे कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींचेही आरोग्य धोक्यात

दुष्परिणामच अधिक : आवाजामुळे कान तर लेझरमुळे डोळ्यांना इजा शक्य

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शिजजयंतीनिमित्त निघणार्‍या चित्ररथ मिरवणुकीत डीजेचा शिरकाव झाल्यानंतर अनेक दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणावर तर परिणाम झाला आहेच पण लोकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. डीजेच्या दणदणाटासह डोळे दिपवून टाकणार्‍या लेझरमुळे कान व डोळ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

डीजेमुळे मिरवणुकीतील आवाजाची क्षमता वाढल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह देखावे पाहायला येणार्‍या शिवप्रेमींच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या. गर्भवती महिला, आजारी व्यक्ती व वृद्धांसाठी तर हे कर्णकर्कश संगीत शापच ठरत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणे, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रकार वाढले आहे. याशिवाय रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात वावरले तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.

मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा विसरुन डीजेच्या तालावर ठेंगा धरण्यात तरुणाई धन्यता मानत आहे. उच्च डेसिबल पातळीमुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चक्कर येऊ शकते, हृदयविकार, डायबेटिस आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. सतत मोठा आवाज ऐकल्याने श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असतो. सतत मोठ्या आवाजामुळे तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. मोठा आवाज डोकेदुखीला कारणीभूत ठरु शकतो. कायमस्वरुपी बहिरेपण येऊ शकते. त्यामुळे, चित्ररथ मिरवणुकीतून डीजेला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनीही एकजुटीने आवाज उठविण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT