बंगळूर : आयपीएल कप जिंकल्यानंतर आरसीबी संघाच्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने आता एक नवीन वळण घेतले आहे. आयपीएल फायनल सुरू होण्यापूर्वीच विजयाचा आनंद साजरा करण्याची मागणी करणारा अर्ज आरसीबी संघ व्यवस्थापनाने बंगळूर शहर पोलिसांकडे केला होता, असे उघड झाले आहे. यावर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आश्चर्य व्यक्त करत अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच तो जिंकणार हे आरसीबी संघ व्यवस्थापनाला माहीत होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
स्वामी शनिवारी (दि. 7) पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहमदाबादमधील अंतिम सामना संध्याकाळी 7 : 30 वाजता सुरू झाला. तर आपण संध्याकाळी 6 वाजताच विजयोत्सव साजरा करण्यासाठी आरसीबी संघाने पोलिसांकडे अर्ज सादर केला होता. सामना सुरू होण्यापूर्वीच त्यांचा संघ जिंकेल हे आरसीबी बोर्डाला कसे कळले? त्यांना स्वप्न पडले होते का की आपण जिंकू? नंतर त्यांनी विधानसौधसमोर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागण्यासाठी प्रशासकीय सुधारणा विभागकडे दुसरा अर्ज केला? ही सर्व पत्रे कोणी लिहिली? सामन्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 7.30 वाजता पोलिस आयुक्तांवर कोणी दबाव आणला?
मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदावरून गोविंदा राजू यांना काढून टाकणे हे एक चांगले पाऊल आहे. या असंवेदनशील सरकारला किमान आता तरी शुद्धीवर आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र पाच पोलिस अधिकार्यांचे निलंबन योग्य नाही. हे निलंबन आवश्यक नव्हते, असेही स्वामी म्हणाले. जर सरकार असे वागले तर अधिकारी काम करू शकणार नाहीत. आपल्या चुका झाकण्यासाठी अधिकार्यांना शिक्षा करणे योग्य नाही. सरकारने काळजीपूर्वक विचार करायला हवा होता. या घटनेची मूळ कारणे वेगळी आहेत. सरकार ती कारणे लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप-निजद मृतदेहावर राजकारण करत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वामी म्हणाले, आम्हाला मृतदेहावर राजकारण करण्याची गरज नाही. मी जे घडले ते सांगितले आहे. माझ्या मित्र पक्षानेही ते सांगितले आहे. जे घडले ते आम्ही सांगितले आहे. यात राजकारण काय आहे? स्टेडियमसमोर मृतदेह पडल्यानंतरही स्टेडियममध्ये जाऊन कपचे चुंबन घेतले आणि शो कोणी केला, असा संताप त्यांनी व्यक्त केला.