मधुकर पाटील
निपाणी: धारवाड-गदग सीमेवर हुबळी-कोपळ मार्गावर भरधाव कारची दुभाजकाला धडक बसल्यानंतर इंधन टाकीचा स्फोट झाल्याने कारला भीषण आग लागली. या अपघातात हावेरी येथील लोकायुक्त विभागाचे सीपीआय षडाक्षरी सालीमठ (वय ४७) यांचा कारमध्येच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.५) रात्री दहाच्या सुमारास घडली. घटनेची नोंद अन्नीगेरी (जि.धारवाड) पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत सालीमठ हे मूळचे मुरगोड (ता. सौंदत्ती) येथील रहिवासी असून ते सध्या हावेरी लोकायुक्त विभागात सेवेत आहेत. दरम्यान ते शुक्रवारी रात्री ते बेळगाव येथे शनिवारी न्यायालयाचे काम असल्याने आपल्या कारने बेळगावकडे येत होते. दरम्यान त्यांची कार धारवाड-गदग सीमेवर हुबळी कोप्पळ मार्गावर अन्नीगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता कारची दुभाजकला धडक बसून कार विरुद्ध दिशेला जाऊन थांबली.
दरम्यान याचवेळी कारच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन शॉर्टकटमुळे कारने लगेच पेट घेतल्याने कार चालवित असलेले सालीमठ हे कारमध्येच अडकून पडल्याने या आगीत त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुळगुंदचे सीपीआय संगमेश शिवयोगी, अन्नीगिरीचे सीपीआय रवी कपतणावर,उपनिरीक्षका उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. शिवाय अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान तत्पूर्वीच या घटनेत कार बेचिराख होवुन सालीमठ यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
सालीमठ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सालीमठ हे अत्यंत मनमिळावू व हळव्या स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची पोलीस खात्यात आतापर्यंत २५ वर्षे सेवा झाली असून त्यांच्या या अकाली निधनामुळे पोलीस प्रशासनाकडून हळहळ व्यक्त होत आहे.