खानापूर : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड गावात पिढ्यान्पिढ्या जपली जाणारी तुळशी-विवाहाची मंगल परंपरा यंदाही भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी होणार आहे. ‘एक गाव, एक तुळस’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून सोमवारी (दि. २३) गावात तुळशी-विवाहाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्रद्धास्थान असलेल्या तुळसादेवीच्या चरणी नतमस्तक होत सुख, शांती, समृद्धी आणि गावातील एकोपा अखंड नांदावा, अशी प्रार्थना ग्रामस्थ करणार आहेत. पूर्वजांनी रुजविलेली ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोचविण्याच्या ध्यासातून ग्रामस्थांनी आजही तिचे पावित्र्य आणि सातत्य जपले आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गावापासून दूर असलेल्या माहेरवाशिणी, सासुरवाशिणी तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे, बंगळूर यासारख्या बाहेरगावी स्थायिक झालेले गावकरी या निमित्ताने आवर्जून एकत्र येतात. त्यामुळे तुळशी-विवाह हा केवळ धार्मिक विधी न राहता नात्यांचा ओलावा जपणारा आणि गावाच्या एकजुटीला बळ देणारा स्नेहसोहळा ठरतो.
गावच्या मातीची ओढ आणि माणसांमधील जिव्हाळा या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्यात पारंपरिक विधी-विधानांनी तुळशी-विवाह संपन्न होणार असून, आकर्षक आतषबाजी आणि पारंपरिक प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक सहभागाचा संगम असलेल्या या मंगल सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त हत्तरवाड ग्रामस्थांनी केले आहे. ‘एक गाव-एक तुळस, एक श्रद्धा-एक परिवार’ या भावनेतून साजरा होणारा हा सोहळा गावच्या सांस्कृतिक एकात्मतेचे आणि परंपराप्रेमाचे दर्शन घडविणार आहे.