संदीप तारिहाळकर
बेळगाव : गरीब, श्रीमंत सर्वांनाच सोन्याच्या दागिन्यांचा मोह असतो. मात्र आपण खरेदी केलेल्या सोन्याची शुध्दता कळते हॉलमार्क दागिन्यांवरुन, सध्या हॉलमार्किंग असलेले दागिने खरेदी करण्यात शहरातील ग्राहक पुढे असलेले पाहायला मिळते. ग्रामीण भागातील ग्राहक मात्र याबाबतीत उदासीन असल्याची स्थिती आहे.
सोन्याच्या दागिन्यांतून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, सोन्यामध्ये भेसळ होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभर हॉलमार्क दागिन्यांची विक्री करण्याची सक्ती आहे. ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्कशिवाय दागिने विक्री करणाऱ्यांवर बीआयएसने (व्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्स) बेळगावसह अनेक ठिकाणी कारवाईचा बडगा उभारला आहे.
बेळगावात २ हॉलमार्क सेंटर बीआयएसच्या नियंत्रणाखाली देशभरात विविध ठिकाणी हॉलमार्क सेंटर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खडेबाजार व शहापूर येथे दोन हॉलमार्किंग सेंटर कार्यान्वित आहेत.
बेळगाव जिल्ह्याचा विचार करता शहरी भागातील ग्राहकांकडून हॉलमार्क दागिने खरेदी करण्यात येत आहेत. पण, ग्रामीण भागात अद्यापही हॉलमार्क जागृतीअभावी हॉलमार्क दागिन्यांची मागणीही होत नाही आणि खरेदीही होत नाही, अशी स्थिती आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातही विना हॉलमार्क दागिन्यांची विक्री करणाऱ्या सराफांवर कारवाईची मागणी होत आहे. असे झाल्यास ग्रामीण भागातील ग्राहकांनीही सोन्याच्या दागिन्यांच्या शुध्दतेची हमी मिळेल. आपण खरेदी केलेले सोनचे दागिने कोणत्या प्रतीचे आहेत, याची पडताळणी करणे सहज शक्य नाही. यासाठी हॉलमार्किंग प्रणाली गरजेची आहे.
बीआयएस केअर हे अॅप मोबाईवलर डाऊनलोड करुन खरेदी केलेल्या दागिन्याचा हॉलमार्क नंबर शोधल्यास दागिना दर्जेदार आहे का नाही, हे तपासता येते. हॉलमार्क असलेल्या सर्वच दागिन्यांवर बीआयएसचे चिन्ह, हॉलमार्क केंद्राची खूण असते, यावरुन सोन्याची शुद्धता आणि तो दागिना कधी बनवला, याचा उल्लेख असतो, याची ऑनलाईन नोंदही असते.
सर्वच ग्राहकांनी हॉलमार्कचे दागिने खरेदी करावेत. जेणेकरुन त्यांना शुध्दतेची हमी मिळते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत नाही. बेळगावात अनेक सराफ संघटनांनीही याबाबत जागृती केली आहे. शहरात याबाबत सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.- अतुल हेरेकर, सराफ व्यवसायिक
हॉलमार्क दागिन्यांमुळे सोन्याच्या शुध्दतेची हमी मिळते. तसेच गरजेपोटी सोन्यावर कर्ज घ्यायचे असल्यास वा विकायचे झाल्यास त्या दागिन्याची शुद्धतेची खात्री लवकर होते. त्यामुळे आम्ही नेहमी हॉलमार्किंग दागिन्यांचीच खरेदी करतो.- रंजना कारेकर, ग्राहक