Appachiwadi Halasiddhanath Temple
निपाणी : कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री. हालसिध्दनाथ देवाची विशाल तीर्थयात्रा व महाअभिषेक सोहळा सोमवारी (दि.१९) अमाप उत्साहात पार पडला. वर्षातून केवळ एकवेळ म्हणजे विशालतीर्थ अमावस्यानिमित्त नाथांच्या मूर्तीवर महाअभिषेक (दुग्धाभिषेक) होतो. हा ऐतिहासिक सोहळा प्रत्यक्ष डोळ्यात टिपण्यासाठी हजारो भाविकांनी यावेळी वाडा मंदिरात उपस्थिती लावली होती. दरम्यान यावेळी झालेल्या वालंग (ढोल वादनाने) सारा परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान, सोमवारी विशालतीर्थ अमावस्या यात्रेनिमित्त सकाळी भक्तांच्यावतीने वेदगंगा नदीतील पाणी कलशातून आणण्यात आले. यावेळी नाथांच्या खडक मंदिर (उत्सव स्थळापासून) समाधी (घुमट मंदिर) येथुन अश्व ढोल, निशाण सर्व लवाजमा वाडा मंदिर येथे दाखल झाल्यानंतर मुख्य महाअभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली.
सकाळी ११ ते २ या वेळेत हा सोहळा पार पडला. दोन तास चाललेल्या या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण भक्तीमय बनले होते. या काळात उपस्थित भक्तांकडून श्री हालसिद्धनाथांच्या नावान चांगभलसह अखंड (ढोल वालंग) वालंग वादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे हा परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी नाथांचे प्रमुख पुजारी व मानकरी, सेवेकरी यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.महाअभिषेक सोहळ्यानंतर उपस्थित भक्तांना महाअभिषेक प्रसादाचे वाटप करण्यात आले.दरम्यान दिवसभर भाविकांनी आप्पाचीवाडी येथे नाथांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.