बंगळूर : जगामध्ये केवळ 30 टक्के लोकांसाठी सुलभरीत्या आरोग्यसेवा उपलब्ध आहे. उर्वरित 70 टक्के लोकांना ती महागडी असून, वेळेत मिळत नसल्याचे प्रतिपादन डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी केले.
जागतिक गुंतवणूकदार मेळाव्यात ‘भारतापुढील नावीन्यतेचे शक्तिकेंद्र : क्वीन सिटीच्या विकासासाठी कर्नाटकाचा आराखडा’ या विषयावरील परिसंवादावर ते बोलत होते. क्वीन सिटीमध्ये आरोग्य सेवांशी संबंधित नवे उद्योग आले, तर आरोग्य सेवा काही प्रमाणात स्वस्त होईल. अशा उद्योगांमुळे प्रशिक्षित वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येत उपलब्ध होतील. येथे प्रशिक्षित मनुष्यबळ जगातील कानाकोपर्यात दिसावे, असे ते म्हणाले.
क्वीन सिटीमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा विचारात घेणे गरजेचे आहे. जगामध्ये समाधानकारक आरोग्य सेवा द्यायची असेल, तर 30 अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक करावी लागेल. आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा अशा समस्याच निर्माण होऊ नयेत म्हणून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. आरोग्यसेवेचा अशाप्रकारे उपयोग करण्यासाठी कंपनी, रुग्णालयांनी प्रयत्न करावेत. रुग्णालय आणि रुग्णांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करणार्या विमा क्षेत्रातील चेहर्यांनी जनस्नेही होण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. भारतात दर्जेदार डॉक्टर आहेत. अमेरिका आणि इंग्लंडमध्येही भारतीय डॉक्टरांकडेच उपचारास तेथील लोक प्राधान्य देतात. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जगभरात 18 दशलक्ष दादींची उणीव आहे. विदेशामध्ये सुश्रूषा क्षेत्रात युवती दरमहा एक ते दीड लाख रुपये कमवत असल्याची माहिती डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी दिली.
भविष्यात मृत्यूनंतरही आपली मुले, नातवांशी संपर्क साधता येणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) हे शक्य होईल. गेल्या तीन वर्षांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगती कितपत होणार हे कुणीही सांगितले नव्हते. आता त्याचा अनुभव प्रत्येकजण घेत असल्याचे गुगल एक्स संस्थेचे संस्थापक सेबॅस्टियन थ्रन म्हणाले. एआय वर आधारित त्यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात स्वयंचलित कार येईल. ती परिपूर्ण ड्रायव्हिंग करेल. सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे असणारे वेवो कार पूर्णपणे ऑटोमेटिक असून, कुणीही तिला सूचना देत नाही. एआयबाबत सुरुवातीला लोकांमध्ये नकारात्मक भावना होती; पण याचा वापर सुरू झाल्यानंतर हे तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त असल्याचा विश्वास बसला. याबाबतची भीती आता नाही. आगामी तीन वर्षांत एआयच्या माध्यमातून आपण किती प्रगती करू, हे सांगता येणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
विकसित तंत्रज्ञानामुळे उत्पादन आणि पुरवठा क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत. या क्षेत्रातील मागणीनुसार स्वत:मध्ये बदल करून घेण्याची गरज निर्माण झाल्याचे महिंद्रा ग्रुपच्या एआय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवन लोढा यांनी सांगितले. उद्योगातील उत्पादन आणि पुरवठा क्षेत्रातील बदलांविषयी त्यांनी मत व्यक्त केले. ग्राहकाला काय हवे आहे, याची परिपूर्ण कल्पना आता कंपन्यांना येत आहे. उत्पादन क्षेत्रात निर्णयक्षमतेला महत्त्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहक आणि यंत्र यांच्या समन्वयाने निर्णय घेण्याची वेळ आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.